बेळगाव :
कपिलेश्वर मंदिराच्या तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाचा जीव पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वेळेवर आणि धाडसी हस्तक्षेपामुळे वाचला. ही घटना मंगळवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक तलावात बुडताना आढळून आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी मारली व युवकाला बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत होता. तत्काळ पोलिसांनी सीपीआर देत त्याला शुद्धीवर आणले आणि त्याचा प्राण वाचवला.
या घटनेनंतर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने घटनास्थळी येत आपल्या सहकाऱ्यांसह पद्मप्रसाद हूली व मायकेल पिंटो यांच्या मदतीने युवकाला मानसिक आधार व समुपदेशन देण्यास सुरुवात केली.
शुद्धीवर आल्यानंतर युवकाने पथकाची दिशाभूल करत जवळच्या रेल्वे रूळांकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच त्याला अडवले. चौकशीत युवकाने कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावाखाली आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
कर्नाटक राज्य पोलिसांची सतर्कता आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एक अमूल्य जीव वाचला. या घटनेमुळे आत्महत्या प्रतिबंधासाठी पोलीस व सामाजिक संस्थांमधील समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पुढील उपचारांसाठी युवकाला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
