चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानचा पारंपरिक इंगळ्या उत्सव रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे. दरवर्षी रेणूका देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर या उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही त्याच परंपरेनुसार सायंकाळी ४.०० वाजता इंगळ्या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
पहाटे देवाचा अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. सायंकाळी प्रदक्षिणेसाठी देवांना पालखीतून बाहेर काढण्यात येणार आहे. या वेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देव पुन्हा गादीवर विराजमान होतात.
यानंतर नवस फेडणाऱ्या भाविकांकडून श्रीफळाचा वर्षाव करण्यात येतो. वर्षाव केलेली श्रीफळे पकडण्यासाठी भाविकांमध्ये मोठी झुंबड उडते. हा क्षण पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
त्यानंतर मुख्य उत्सव म्हणजेच इंगळ्यांना सुरुवात होते. अत्यंत शांत आणि भक्तीमय वातावरणात देवाला गाऱ्हाणे घालण्यात येते आणि इंगळ्या उत्सव विधीपूर्वक पार पडतो.
वरील माहितीप्रमाणे इंगळ्या उत्सव साजरा होणार असून सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
