बेळगाव : बेळगाव वस्त्र व्यापारी संघटना (BCMA) व ट्रेडर्स कौन्सिलच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका आयुक्त श्री. कार्तिक एम. (KAS) यांना प्री-बजेट निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात व्यापार, बाजारपेठा, नागरी सुविधा, पर्यावरण व नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी १७ महत्त्वाच्या आणि प्राधान्याच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
निवेदनाच्या सुरुवातीलाच संघटनेने आयुक्त श्री. कार्तिक एम. यांच्या कार्यक्षम, सक्रिय व नागरिकाभिमुख नेतृत्वाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव एक आधुनिक, समावेशक व सुशासित शहर म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्नाटकाची दुसरी राजधानी, महाराष्ट्र व गोव्याला लागून असलेले सीमावर्ती शहर, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर व भारतीय हवाई दलाचे केंद्र, तसेच उत्तर कर्नाटकातील प्रमुख व्यापार व निर्यात केंद्र असलेल्या बेळगावमध्ये वस्त्र व कापड व्यापार शहराच्या सुमारे ६५ टक्के GDP मध्ये योगदान देतो आणि जवळपास ३५ टक्के लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देतो. मात्र, या तुलनेत बाजारपेठ व नागरी पायाभूत सुविधांचा विकास अपेक्षित वेगाने झालेला नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेने व्यापार परवाना प्रक्रिया सुलभ करणे व जनजागृती, दरवर्षी “व्हायब्रंट बेळगाव” व्यापार व शहर प्रचार मेळावा, एकच केंद्रीत महापालिका हेल्पलाईन, बाजारपेठांमध्ये महिलांसाठी पिंक टॉयलेटसह सार्वजनिक शौचालये, प्रमुख ठिकाणी प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ, बाजार भागात शटल किंवा मिनी बस सेवा, पिण्याच्या पाण्याच्या व्हेंडिंग मशिन्स, मल्टिलेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्सची उभारणी, SAS/मालमत्ता कर वाढ पुढे ढकलणे, महिलां व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित वॉकर झोन व नाना-नानी पार्क, बाजारपेठांमध्ये CCTV व प्रकाशव्यवस्था, हरित शहर उपक्रम, वॉर्डस्तरीय तक्रार निवारण कक्ष, इंदूर मॉडेल स्वच्छता व्यवस्था, समतोल पाणीपुरवठा व दहनभूमी सुविधा, दीर्घकालीन वस्त्र व टेक्स्टाईल क्लस्टर प्रस्ताव तसेच संपूर्ण शहरात रस्त्यांची नावे व दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, या सर्व मागण्या आगामी अर्थसंकल्पात व कृती आराखड्यात समाविष्ट झाल्यास बेळगाव शहर स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, तसेच व्यापारी व नागरिकांचे जीवनमान उंचावेल.
हे निवेदन BCMA अध्यक्ष सतीश तेंडुलकर, सचिव मुकेश खोडा, खजिनदार नितेश जैन, माजी अध्यक्ष विकास कलघटगी, बसवराज जवळी यांच्यासह ट्रेडर्स कौन्सिल व इंडस्ट्रियल फोरमच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, तसेच महापौर व उपमहापौर यांनाही पाठविण्यात आली आहे.
