बेळगाव – “हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे” या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या भव्य हरे कृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगाव नगरी कृष्णमय केली. दुपारी ठीक १ वाजून ३१ मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे शहरासाठी एक आनंदोत्सव ठरला.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या रथयात्रेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे. दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौकात हजारो स्त्री-पुरुष भक्त एकत्र जमले होते. यावेळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज तसेच वृंदावन येथील ब्रजेश चंद्र गोस्वामी प्रभू यांची मार्गदर्शनपर प्रवचने झाली.
फुलांनी सजविलेल्या भव्य रथामध्ये राधा-कृष्ण, नित्यानंद महाप्रभू आणि गौरांग महाप्रभू यांचे आर्चविग्रह विराजमान होते. रथाचे पूजन व आरती झाल्यानंतर खासदार इराण्णा कडाडी यांनी श्रीफळ वाढवून रथयात्रेस प्रारंभ केला. रथाच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या दोरखंडांना डावीकडून पुरुष तर उजवीकडून महिला भक्तांनी श्रद्धेने ओढ दिली.
रथाच्या अग्रभागी आबालवृद्ध भक्त हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात तल्लीन झाले होते. मशीनद्वारे भक्तांवर सुगंधित द्रव्यांचे सिंचन करण्यात येत होते. यात्रेच्या पुढील भागात मंजिरी बेनके यांच्या नेतृत्वाखाली ३० हून अधिक तरुणींच्या तीन पथकांनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या. त्यापाठोपाठ वीसहून अधिक सजवलेल्या बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. एका विशेष रथामध्ये इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची प्रतिमा विराजमान होती.
भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित विविध देखावे—भीष्म शरशय्येवर, नरसिंह देव, कालिया मर्दन, झारखंड लीला—यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भक्तीरसामृत स्वामी महाराज स्वतः रथयात्रा मार्गावर लक्ष ठेवून मार्गदर्शन करत होते. ताल धरून नृत्य करणाऱ्या तरुणी, भजन-कीर्तनात सहभागी तरुण, रंगीबेरंगी पोशाखातील बालकांनी रथयात्रेची शोभा वाढवली. हांदिगनूर येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या स्त्री-पुरुषांच्या दोन संचांनी भजने सादर केली.
मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. पाणी, सरबत, फळे व केळी यांचे वाटप करण्यात आले. इस्कॉनच्या वतीने सुमारे ५० हजारांहून अधिक प्रसाद पाकिटांचे वितरण झाले. सुमारे दीड किलोमीटर लांबीचा हा लवाजमा शहराच्या विविध भागांतून मार्गक्रमण करत होता.
ही रथयात्रा धर्मवीर संभाजी चौकातून समादेवी मंदिर, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड, टिळक चौक मार्गे शनी मंदिर, कपिलेश्वर रेल्वे ब्रिज ओलांडून शहापूर येथे पोहोचली. पुढे नाथ पै सर्कल, के.एल.ई. आयुर्वेदिक कॉलेज, कृषी भवन, बसवेश्वर सर्कल मार्गे सायंकाळी साडेसहा वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामागील उभारण्यात आलेल्या शामियाण्यात रथयात्रेचा समारोप झाला.
मंदिरातील कार्यक्रम
शनिवारी सकाळी गौर आरती, भजन व कीर्तन झाले. त्यानंतर परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले.
रविवारचे कार्यक्रम
रविवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत मानवजातीच्या कल्याणासाठी नरसिंह यज्ञ होणार आहे. सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यलीला व सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृष्णभक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शन व उपक्रम
आज व उद्या दोन दिवस भगवद्गीता प्रदर्शन, स्लाइड शो, मेडिटेशन पार्क, गोसेवा स्टॉल्स, आध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन तसेच युवक-युवतींसाठी मार्गदर्शन स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. अनेक ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने झाली असून कृष्णभक्तीचे महत्त्व विविध उदाहरणांतून उलगडून सांगण्यात आले.
पार्किंगबाबत आवाहन
इस्कॉन मंदिर परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने मंदिराबाहेरील मुख्य रस्त्यावरच पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
रथयात्रा महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी इस्कॉनच्या वतीने विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. संकर्षण प्रभू, माधवचरण प्रभू, नंदनंदन प्रभू, संजीवनी कृपा प्रभू, नागेंद्र प्रभू, प्रेम रस प्रभू, रामप्रभू, राजाराम भांदुर्गे, उंडाळे प्रभू, क्वात्रा प्रभू, आनंद भांदुर्गे, अरविंद कोल्हापूरे आदी कार्यकर्ते या यात्रेत सक्रियपणे कार्यरत होते.
