शहरातील कचरा वाहतूक व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे आज महानगरपालिकेच्या कचरा उचलणीचे काम विस्कळीत झाले. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या उपलब्ध नसल्याने कचरा कर्मचारी अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत शहर स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कचरा कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खासगी गाड्यांचा वापर करत नागरिकांकडील कचरा गोळा केला.
महानगरपालिकेच्या सुमारे १५ ते २० कचरा वाहतूक गाड्या चालकांच्या एन्ट्रीसंदर्भातील कारणांमुळे ठेकेदाराकडून उपलब्ध करून देण्यात न आल्याने आज कचरा उचलणी ठप्प झाली होती. मात्र, आपली जबाबदारी ओळखून कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत कचरा उचलून तो थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये टाकला.
कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या कर्तव्यनिष्ठेमुळे काही प्रमाणात तरी शहरात स्वच्छता राखली गेली. मात्र, अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या निष्काळजीपणाकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
