‘मराठी सन्मान यात्रे’त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार

‘मराठी सन्मान यात्रे’त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली रायगड येथे निघणाऱ्या मराठी सन्मान यात्रेत येळ्ळूर गावातील शेकडो कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मी गल्लीतील दत्त मंदिर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. वामनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवहिंद को-ऑप. सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर, इंजिनिअर हणमंत कुगजी आणि प्रशांत मजुकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना युवा नेते शुभम शेळके यांनी येळ्ळूर गाव हे नेहमीच सीमालढ्याच्या अग्रभागी राहिले असून आजही शेकडो कार्यकर्त्यांनी मराठी सन्मान यात्रेत सहभाग दर्शवून सीमाप्रश्नी आपली निष्ठा अधोरेखित केली आहे. येळ्ळूर गावाने आमच्यावर दाखवलेला विश्वास अबाधित ठेवत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत दुद्दापा बागेवाडी यांनी मराठी सन्मान यात्रेला जाहीर पाठिंबा देत युवकांनी सीमालढ्यात अधिक सक्रिय सहभाग घेऊन चळवळ बळकट करावी, असे आवाहन केले. तर प्रकाश अष्टेकर यांनी सीमालढ्यात येळ्ळूर गावाने जसा सातत्यपूर्ण सहभाग दर्शवला आहे, तसाच युवा वर्गाच्या पाठीशीही गाव ठामपणे उभे राहील, असे मत व्यक्त केले.

खानापूर युवासमितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग ही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सीमाप्रश्न सुटेपर्यंत हा लढा तेवत ठेवेल, असे आश्वासन दिले. यावेळी अमोल जाधव, गणेश अष्टेकर, श्रीकांत नांदुरकर आदींनी आपले विचार मांडले.

मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन, हिंदवी स्वराज्य युवा संघटना, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, छत्रपती विराट गड संवर्धन पथक, छत्रपती विराट हलगी पथक, शेतकरी कामगार गणेशोत्सव (कलमेश्वर गल्ली), शिवसेना (विराट गल्ली), गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, दुर्गा माता मंडळ तसेच उषानारायण फाउंडेशन यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

या उपक्रमासाठी नितेश फकिरा काकतकर यांनी २५ हजार रुपये, श्रीकांत शिवाजी नांदुरकर यांनी १० हजार रुपये व दोन क्विंटल तांदूळ, सुनील वामनराव पाटील यांनी १० हजार रुपये, हणमंत लु. कुगजी यांनी ५,०५१ रुपये, अमित य. पाटील, परशराम निंगापा धामणेकर व बाळासाहेब पावले यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये, हिंदवी स्वराज्य संघटना यांनी ५ हजार रुपये, प्रभाकर मंगणाईक यांनी २,५०० रुपये तर कलमेश्वर गल्ली कामगार संघटनेच्या वतीने देणगी देण्यात आली. तसेच श्रीचांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे प्रसाद यल्लोजी मजुकर यांनी २० बॉक्स पाण्याच्या बाटल्यांची देणगी दिली. मिलिंद अष्टेकर, महेश कुगजी, ऋषी मजुकर आणि प्रवीण मजुकर यांनी वैद्यकीय किट दिले.

या बैठकीस उदय जाधव, राजू पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल, अनिल हुंदरे, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू चौगुले, यल्लापा पाटील, सतीश देसुरकर, मनोज कुगजी, विनोद लोहार, संकल्प जाधव, सागर नायकोजी, ओमकार पाटील, सुमंत कुगजी, योगेश कदम, राहुल कुगजी, प्रवीण मुचंडी, भावू हलगेकर, किरण उडकेकर, गजानन कुंडेकर, अवधूत लोहार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते दत्ता उघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × four =

error: Content is protected !!