बेळगाव (बैलहोंगल) : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. लग्न होऊन तीन वर्षे झाली तरी अपत्य न झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
फकीरप्पा गिलक्कनवर (रा. नेगिनहाळ) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने पत्नी राजेश्वरी (वय २१) हिचा उसिरगाठून खून केल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची खोटी कथा रचत आरोपीने नातेवाइकांना घटनेची माहिती दिली होती.
मात्र अंत्यसंस्काराच्या वेळी राजेश्वरीच्या गळ्यावरील जखमेच्या खुणा पाहून तिच्या पालकांना संशय आला. त्यांनी तत्काळ बैलहोंगल पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
शवविच्छेदन अहवालात राजेश्वरीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी फकीरप्पाला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
