बेळगाव : बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहर पोलिसांकडून कडक वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. शहरातील त्रिवेणी हॉटेल परिसरापासून सीबीएस (सेंट्रल बस स्टँड) सर्कलपर्यंत तसेच कीर्ती हॉटेल क्रॉसपासून संगोळी रायण्णा (आरटीओ) सर्कलपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहन उभे करण्यास (नो-पार्किंग) मनाई करण्यात आली आहे.
तसेच कृष्णदेवराय (कोल्हापूर) चौक पासून महानगरपालिका कार्यालय क्रॉसपर्यंत रस्त्याची सुरक्षितता व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी ठरावीक दिवशी सम-विषम तारखेनुसार दोन्ही बाजूंनी वाहन पार्किंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरात शाळा, महाविद्यालये सुरू-बंद होण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढत असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा कलम 177 व 190(2) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ‘नो-एंट्री’ नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर 2025 मध्ये आतापर्यंत 1001 प्रकरणे दाखल करून 4,17,050 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुढेही नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, खासगी बसमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 27 जानेवारी 2026 पासून प्रवासी उचलणे व सोडणे यासाठी तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये (1) भरतेश स्कूल (पे-पार्किंग), (2) अशोकनगर येथील ओएनजीसी केंद्रासमोरील मोकळी जागा (पे-पार्किंग) आणि (3) धर्मनाथ सर्कल ते अशोकनगर रस्ता या ठिकाणांचा समावेश आहे.
खासगी बस चालक व मालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी केले आहे.
