कंग्राळी बुद्रुक :
कंग्राळी बुद्रुक येथे येत्या 28 एप्रिल 2026 रोजी 45 वर्षांनंतर भरवण्यात येणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, त्याअंतर्गत मंदिराच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम नुकताच मोठ्या भक्तिभावात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लाप्पा पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणप्रेमी अमोल पाटील, मारुती पाटील, शासकीय ठेकेदार प्रभाकर पाटील, संजय कडोलकर, तलाठी कुगजी, एम. आर. पाटील, कपिल कडोलकर व प्रशांत पवार यांची उपस्थिती होती.
महालक्ष्मी यात्रेनिमित्त मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण करून भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात येत असून, या कामास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्लॅब भरणीच्या कार्यक्रमात विधीवत पूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कोनेरी यांनी केले, तर सदानंद चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४५ वर्षांनंतर होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेबाबत कंग्राळी बुद्रुक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांकडून तयारीला वेग देण्यात येत आहे.
