कंग्राळी खुर्द :
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने कंग्राळी व अलतगा गावातील एकूण 79 शारीरिक विकलांग व्यक्तींना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कुस्ती व खो-खो खेळाडूंचा शाल, श्रीफळ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या विकास निधीतील ५ टक्के अनुदानातून एकूण 2 लाख 85 हजार रुपये खर्च करण्यात आला.
शारीरिक विकलांग व्यक्ती व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महात्मा फुले मंगल कार्यालय येथे ग्रामपंचायत अध्यक्षा दोडव्वा माळगी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पीडीओ गोपाळ नाईक यांनी स्वागत केले, तर अंध गायक शंकर मुतगेकर यांनी स्वागतगीत सादर केले.
प्रास्ताविकात न्यायदान कमिटी अध्यक्ष रमेश कांबळे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना, तालुक्यात विकलांग व खेळाडूंकरिता ग्रामपंचायतीच्या ५ टक्के निधीतून खर्च करणारी कंग्राळी खुर्द ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्लापा पाटील व सदस्य यल्लापा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत, ग्रामपंचायत नेहमीच विकलांग नागरिकांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले.
यानंतर कंठीरवा केसरी पै. कामेश पाटील, सीएम चषक विजेते पै. प्रेम जाधव, महिला कुस्तीपटू भक्ती पाटील, तसेच अलतगा शाळेच्या खो-खो खेळाडू संचिता पाटील व समीक्षा पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व 10 ते 15 हजार रुपयांचे धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महिला विकलांगांना तसेच ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, विनायक कम्मार, पीडीओ गोपाळ नाईक व मदतनीस करीअप्पा चव्हाण यांच्या हस्ते पुरुष विकलांग व्यक्तींना कमोड खुर्ची, वॉटर बेड, चार्जिंग विद्युत विजेरी असे साहित्य वाटप करण्यात आले. एकूण 80 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमास विकलांग व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील यांनी आभार मानले.
विशेष बाब म्हणजे, कंठीरवा केसरी पै. कामेश पाटील यांनी आपल्याला मिळालेला 15 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर धनादेश गरजू व गरीब विकलांग व्यक्तींकरिता साहित्य खरेदीसाठी ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करणार असल्याची घोषणा करून उपस्थितांची मने जिंकली.
