बेळगाव : दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास, बेळगाव शहरातील ऑटो नगर परिसरातील टाटा पॉवर प्लांटजवळून कणबर्गी रोडकडे जाणाऱ्या डबल रोडवर बेकायदेशीररीत्या पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे मार्केट उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) श्री. संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बी. आर. गडप्पेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. तपासणीदरम्यान टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक GJ-12-BT-7089) यामध्ये कोणतीही वैध कागदपत्रे नसताना महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात बेकायदेशीररीत्या डिझेलची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी टँकरसह त्यामधील सुमारे १७ हजार लिटर डिझेल (पेट्रोलियम पदार्थ) जप्त केला असून, जप्त करण्यात आलेल्या डिझेलची अंदाजे किंमत १५ लाख रुपये, तर टँकरची किंमत सुमारे १२ लाख रुपये असून एकूण जप्त मालाची किंमत सुमारे २७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी खालील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे :
- दिनेश कुमार (रा. बाडमेर, राजस्थान)
- सुखदेव बियारा (रा. बाडमेर, राजस्थान)
- इस्तियाक शेख (रा. मुंबई, महाराष्ट्र)
- कुंदन माते (रा. मुंबई, महाराष्ट्र)
- समीर परांगे (रा. रायगड, महाराष्ट्र)
- प्रविण ओत (रा. मुंबई, महाराष्ट्र)
- अरिहंत (रा. तुमकूर, कर्नाटक)
या आरोपींविरोधात माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 16/2026 अन्वये अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, भारतीय न्याय संहिता 2023, तसेच मोटार स्पिरिट व हाय-स्पीड डिझेल (नियंत्रण) आदेश 2005 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री. होन्नप्पा तलवार, श्री. श्रीशैल पीएसआय, श्री. उदय पाटील पीएसआय, श्री. पी. एम. मोहिते पीएसआय तसेच माळमारुती पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
