बेळगावमध्ये २४ व २५ जानेवारीला २८ वे ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव’

बेळगावमध्ये २४ व २५ जानेवारीला २८ वे ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव’

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), बेळगाव यांच्या वतीने सलग २८ व्या वर्षी हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. २४ जानेवारी ते रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, याची माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसमृत स्वामी महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली रथयात्रा शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार असून, त्यानंतर २४ व २५ जानेवारी रोजी सायंकाळी भव्य पंडाल कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराच्या मागील मैदानावर होणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ही रथयात्रा प्रचंड भक्तीभाव, उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरी होणार आहे. केवळ भारतातील विविध राज्यांमधूनच नव्हे, तर परदेशातूनही हजारो इस्कॉन भक्त या रथयात्रेत सहभागी होणार असून, बेळगाव शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मार्गावर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

या रथयात्रेच्या मध्यभागी श्री श्री राधा कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान विराजमान असलेला भव्य रथ असणार आहे. आकर्षक वस्त्रालंकार व पुष्पहारांनी सजलेले प्रभू बेळगाववासीयांना आपल्या कृपादृष्टीचा आशीर्वाद देतील. इस्कॉनचे भक्त विविध कीर्तन पथकांमध्ये सहभागी होऊन, रस्त्यांवर नृत्य करत हरिनाम संकीर्तन करणार आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासह अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांमधूनही भक्त बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. या वेळी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज (मॉरिशस), हिज ग्रेस दयाल चंद प्रभू (मुंबई) यांच्यासह अनेक मान्यवर संत व इस्कॉनचे वरिष्ठ भक्त उपस्थित राहणार आहेत.

रथयात्रेदरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच रंगीबेरंगी वेशभूषेत सजलेली मुले भगवानाच्या लीलांचे सजीव सादरीकरण करणार आहेत. बैलगाडी स्पर्धेअंतर्गत सजवलेल्या अनेक बैलगाड्यांची भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे.

या रथयात्रा मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी ५० हजारांहून अधिक प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात येणार असून, इस्कॉनचे भक्त भगवद्गीतेवर आधारित धार्मिक साहित्याचेही वाटप करणार आहेत. अनेक भाविक रथयात्रेवर पुष्पवृष्टी करतील, तर काहीजण भक्तांसाठी पाणी व शरबताची व्यवस्था करणार आहेत.

रथयात्रा मार्गावर भक्तांनी साकारलेली सुंदर रांगोळी आणि विविध रंगांचे ध्वज संपूर्ण मार्गावर झळकणार असून, श्री राधा कृष्णांच्या रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

सदर पत्रकार परिषद इस्कॉन मंदिर, बेळगाव येथे पार पडली. यावेळी सुरुवातीला राम प्रभू यांनी भजन सादर केले. त्यानंतर परमपूज्य भक्ती रसमृत स्वामी महाराज यांनी इस्कॉनच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “जीवनात अध्यात्म नसेल तर मनुष्याच्या आयुष्यात सुख व समृद्धी टिकू शकत नाही.”इस्कॉन बेळगाव येथे गुरुकुल स्थापन करण्यात आले असून या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी नाट्यलीला तयार केली असून ती पूर्ण संकृत भाषेत असून त्याचा लाभ घेण्याचे आव्हान केले.तसेच ही संपूर्ण रथयात्रा ही देणगी स्वरूपात मिळालेल्या मदतीवर संपन्न होते.

मराठी फलक सुरुवातीला न लावल्याबद्दल इस्कॉन मंदिराचे राम प्रभू यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि सदर चूक की अनावधानाने झाली असून भविष्यात अशी चूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला राम प्रभूचैतन्य प्रभू उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × three =

error: Content is protected !!