बेळगाव :
खेळाचा आनंद, आपुलकीचा स्पर्श आणि आत्मविश्वासाची नवी उभारी यांचे अनोखे मिश्रण संजीवीनी फाउंडेशनच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात अनुभवायला मिळाले. काळजी केंद्रातील रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेला हा क्रीडामहोत्सव केवळ स्पर्धांचा कार्यक्रम न राहता आनंद, पुनर्वसन आणि मानवी सन्मानाचा उत्सव ठरला.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संजीवीनी फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. खेळ हे केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून मानसिक स्थैर्य, सामाजिक बांधिलकी आणि भावनिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाचे आहेत, या भूमिकेतून क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात काळजी केंद्रातील ५० हून अधिक रुग्ण-स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मैदानी स्पर्धांमध्ये थ्रो बॉल, पोत्यात पाय घालून उड्या मारणे, लिंबू-चमचा, १०० मीटर रिले शर्यत आणि सावकाश चालणे या खेळांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत स्पर्धकांची जिद्द, चिकाटी आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
यासोबतच इनडोअर स्पर्धांमध्ये कोलाज निर्मिती, मातीपासून वस्तू तयार करणे, केशरचना आणि संगीत खुर्ची अशा सर्जनशील स्पर्धा घेण्यात आल्या. या माध्यमातून रुग्णांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती रोहन जुवळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून क्रीडामहोत्सवाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत संजीवीनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. पाहुण्यांचा परिचय सावित्री माळी यांनी करून दिला.
संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात संजीवीनीच्या कार्याचा गाभा उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या, “काळजी केंद्रातील रुग्णांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. क्रीडा स्पर्धा हा त्यातील महत्त्वाचा भाग असून, या माध्यमातून रुग्णांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यात सकारात्मक बदल घडतात. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून उपचार प्रक्रियेचाच एक भाग आहे.” भविष्यात संजीवीनी फाउंडेशन स्वतःच्या वास्तूमध्ये २०० रुग्णांची सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपायुक्त नारायण बरमणी यांनी संजीवीनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, समाजासाठी अत्यंत विधायक आणि मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचे कार्य येथे सुरू आहे. अशा उपक्रमांमुळे रुग्णांना नवी ऊर्जा मिळते आणि संजीवीनीचे कार्य आदर्शवत आहे.
उद्योगपती रोहन जुवळी यांनीही संस्थेच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. बेळगावमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मनोरुग्णांसाठी इतक्या समर्पणाने काम करणारी संस्था असल्याचा अभिमान वाटतो. भविष्यात ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात वाढवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन मदन बामणे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले तसेच स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. संजीवीनी फाउंडेशनचे प्रत्येक उपक्रम मानवी प्रतिष्ठा जपणारे आणि समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सरिता नाईक, पद्मा औषेकर, पुष्पा बेंडवाड, ऋतुजा काटे, अर्चना शिरहट्टी, सुनील चन्नदासर, संजीवनी पोतदार, अंकिता राजोरे, कावेरी लमानी, गुरुराज हडपद, जमुना कडोलकर, रोहित मंडळे आणि विजयालक्ष्मी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. वैष्णवी नेवगिरी यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाला संचालिका रेखा बामणे तसेच सल्लागार सदस्य डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नवीना शेट्टीगार, संजय पाटील आणि विद्या सरनोबत उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षता अक्कोळे यांनी केले तर आभार कावेरी नेगी यांनी मानले.
