विश्वास पाटील यांच्या हस्ते डॉ. विनोद गायकवाड यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’

विश्वास पाटील यांच्या हस्ते डॉ. विनोद गायकवाड यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’

बेळगाव :
सीमा भागात दर्जेदार आणि सकस मराठी साहित्यनिर्मिती होत असतानाही त्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही. मात्र यापुढे तसे होणार नाही, याची दखल घेण्याची गरज आहे. डॉ. विनोद गायकवाड हे सीमा भागातील सृजनशील साहित्यिक असून त्यांच्या साहित्याचा आज गौरव होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन पानिपतकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्वास पाटील यांनी केले.

ईश्वरपूर येथे रविवारी श्री शिवाजी वाचनालय, कामेरी यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र साहित्य परिषद व कामेश्वरी साहित्य मंडळाच्या चौथ्या साहित्य संमेलनात डॉ. विनोद गायकवाड यांना मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्वास पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कादंबरीकार दि. बा. पाटील, रंगराव बापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना सत्काराला उत्तर देताना डॉ. विनोद गायकवाड म्हणाले, “सीमा भागातील माझ्यासारख्या साहित्यिकाची दखल घेऊन श्री शिवाजी वाचनालयाने मला हा पुरस्कार बहाल केला, याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. सीमा भागात सकस मराठी साहित्यनिर्मिती करणारे अनेक साहित्यिक असून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. या पुरस्कारामागे दि. बा. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचे पाठबळ आहे, हीदेखील आनंदाची बाब आहे.”

या पुरस्कारामुळे सीमा भागातील मराठी साहित्यिकांना नवचैतन्य मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + one =

error: Content is protected !!