दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार २०२५–२६ साठी आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारांतर्गत बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग तसेच खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांची निवड करण्यात येणार आहे. विशेष उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या प्राथमिक शाळांकडून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड झालेल्या पाच शाळांना मानपत्र, मानचिन्ह तसेच शालोपयोगी साहित्य देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बेळगाव शहर, ग्रामीण तालुका व खानापूर तालुक्यातील सर्व मराठी प्राथमिक शाळा अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्यासाठी केलेले प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, शाळेच्या इमारत व सोयीसुविधांमध्ये केलेल्या सुधारणा, तसेच शाळेमार्फत राबविण्यात येणारे सामाजिक, पर्यावरणपूरक व आरोग्यविषयक उपक्रम यांचा विचार करण्यात येणार आहे.
यासह मराठी भाषा, संस्कृती व परंपरा जपण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच विविध क्रीडा, साहित्यिक व स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग या निकषांवर शाळांचे मूल्यमापन होणार आहे.
पुरस्कारासाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा शाळा सुधारणा समितीने ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लेखी अर्ज करावेत. शाळेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती पीडीएफ स्वरूपातही सादर करता येणार आहे. अर्ज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी, बेळगाव येथे स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी अंकुश केसरकर (अध्यक्ष) मोबाईल क्रमांक ९७३९९ ६३२२९ किंवा श्रीकांत कदम (सरचिटणीस) मोबाईल क्रमांक ९६११७ ५६५२९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
