गणेशपूर भागातील प्रसिद्ध सीबीएससी बोर्डाची शाळा बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू होती. अखेर मागील आठवड्यात यासंदर्भात शाळेतील शिक्षक व पालकांना अधिकृत माहिती देण्यात आल्याने या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.
शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील सध्याच्या वास्तूमधील शाळा बंद करण्यात येणार असून, त्या ठिकाणी भव्य हॉस्पिटल उभारण्याची योजना असल्याचे समजते. मात्र शाळा बंद होत असली तरी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संस्थेशी संलग्न असलेल्या इतर शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील दोन वर्षे नववी व दहावीचे वर्ग याच इमारतीत सुरू राहणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग संस्थेच्या इतर शाळांमध्ये शिफ्ट करण्यात येणार असून, पालकांना दोन शाळांचे पर्याय देण्यात आल्याची माहिती आहे.
या निर्णयाविरोधात शाळेतील पालकांनी जोरदार आवाज उठवला आहे. सध्याच्या वास्तूमधूनच शाळा सुरू ठेवावी, तसेच आपल्या मुलांना इतर शाळांमध्ये पाठवण्यास अनेक पालकांनी स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शाळा प्रशासन व पालक यांच्यात पुन्हा बैठक होणार असून, त्यामध्ये कोणता निर्णय घेतला जातो याकडे पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.
