महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमाभागात मराठी अस्मिता, भाषा व हक्कांच्या रक्षणासाठी मराठी सन्मान यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सन्मान यात्रेची सुरुवात येत्या २६ जानेवारी रोजी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन होणार असून, त्यानंतर ही यात्रा सीमाभागात दाखल होणार आहे.
या मराठी सन्मान यात्रेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच यात्रेला पाठिंबा दर्शवण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खानापूर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई होते.
बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. त्यानंतर मराठी सन्मान यात्रेची संपूर्ण रूपरेषा, उद्दिष्टे व कार्यक्रमाची माहिती खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व युवा समिती सीमाभाग कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सविस्तरपणे मांडली. त्यांनी ही यात्रा मराठी समाजाच्या स्वाभिमानाची आणि एकजुटीची चळवळ असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर समितीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाई, विलासराव बेळगावकर, गोपाळराव पाटील, ॲड. अरुण सरदेसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, मुकुंद पाटील, चंद्रकांत देसाई, जयवंत पाटील आदींनी आपली मते मांडत मराठी सन्मान यात्रेला एकमुखी पाठिंबा दर्शवला. यात्रेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी व ती यशस्वी करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे सहकार्य करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या वेळी अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी सन्मान यात्रेला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यात्रेच्या यशासाठी जे काही सहकार्य शक्य आहे ते संपूर्ण ताकदीने करण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या बैठकीस माजी आमदार दिगंबरराव पाटील, प्रकाश चव्हाण, जयराम देसाई, पांडुरंग सावंत, दत्तू कुट्रे, अमृत शेलार, हेब्बाळकर गुरुजी, वसंत नवलकर, बी. बी. पाटील, रमेश धबाले, रविंद्र शिंदे, रामचंद्र गावकर, रुक्माना जुंझवाडकर, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मराठीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेच्या सन्मानासाठी निघणारी ही मराठी सन्मान यात्रा सीमाभागातील मराठी समाजात नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
