सीमाप्रश्नासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी बेळगावात श्रद्धेने साजरी

सीमाप्रश्नासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी बेळगावात श्रद्धेने साजरी

बेळगाव : सीमावासियांचे आधारवड, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, संपूर्ण आयुष्य सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समर्पित करणारे शिक्षणतज्ज्ञ डॉ. एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी आज बेळगावात अत्यंत गांभीर्याने पाळण्यात आली. त्यांच्या जाण्याने सीमावासीय पोरके झाले असून सीमाप्रश्नाच्या चळवळीत आजही क्षणोक्षणी डॉ. एन. डी. पाटील यांची उणीव जाणवत असल्याचे मत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर यांनी व्यक्त केले.

किनेकर म्हणाले की, डॉ. एन. डी. पाटील यांच्या एका शब्दाखातर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते एकवटत असत. सीमाप्रश्नाच्या आंदोलनाला त्यांनी दिलेले ठाम नेतृत्व, स्पष्ट भूमिका आणि वैचारिक बळ आजही चळवळीला दिशा देणारे आहे. विशेष म्हणजे त्यांचा स्मृतिदिन हा सीमाभागातील पहिल्या सत्याग्रहाच्या काळाशी जुळून येतो, हा योगायोग त्यांच्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी असलेल्या तळमळीचेच प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शनिवार, दिनांक १७ रोजी कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात डॉ. एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी श्रद्धेने पाळण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात समितीचे चिटणीस मोनाप्पा संताजी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर माजी आमदार मनोहर किनेकर व लक्ष्मण होणगेकर यांच्या हस्ते डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, अनिल पाटील, मेगो बिर्जे, महादेव बिर्जे, दीपक पावशे, नारायण सांगावकर, आप्पासाहेब कीर्तने, संजय पाटील यांच्यासह समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =

error: Content is protected !!