बेळगाव : शहरातील विविध भागात बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी १४ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत ४ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत बेकायदेशीर दारू, गांजा सेवन करणारे आरोपी तसेच घातक शस्त्र बाळगणारा एक व्यक्ती ताब्यात घेण्यात आला आहे.
हिराबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री करत असताना साजिद सुळेसे नदवीमन (वय ३३, रा. संगोळी रायन्ना सर्कल, भेंडिगेरी, बेळगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून १,५०० रुपयांची ग्रीन चॅम्पियन कंपनीची सुपरियर व्हिस्की (९० मिलीचे ३० सॅशे) जप्त करण्यात आली. याप्रकरणी हिराबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०/२०२६ अंतर्गत अबकारी कायदा १९६५ च्या कलम ३२, ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्ट कंपाउंड परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करत असल्याच्या संशयावरून रोहित रवी लोकंडे (वय १९, रा. मातंगी कॉलनी, काली अंब्राई, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(ब) अंतर्गत गुन्हा क्रमांक ०२/२०२६ नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत चर्च स्ट्रीट परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करत असल्याच्या संशयावरून अफरात सलीम बेपारी (वय २६, रा. काकर स्ट्रीट कॅम्प, बेळगाव) याला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(ब) अंतर्गत गुन्हा क्रमांक ०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या गस्तीदरम्यान गोकुळ गल्ली रेल्वे हॉल्टजवळ सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्र बाळगताना मोहम्मद राजेसाब शेख (वय ३०, रा. गोकुळ गल्ली, हले गांधीनगर, बेळगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एक घातक कत्ती जप्त करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा क्रमांक ११/२०२६ अंतर्गत भारतीय शस्त्र कायदा कलम २७(१) व केपी अॅक्ट कलम ९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चारही कारवाईत पोलिसांनी एकूण ४ आरोपींना अटक करून १,५०० रुपयांची बेकायदेशीर दारू व एक घातक शस्त्र जप्त केले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पीएसआय व पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
