बेळगाव : शहरातील रयत गल्ली परिसरात बेवारस कुत्र्यांचा त्रास वाढत चालला असून याचा फटका आता लहान मुलांना बसू लागला आहे. रविवारी दुपारी रयत गल्लीतील निविका जितेंद्रसिंह राठोड (वय १० वर्षे) या चिमुकलीला बेवारस कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर तातडीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर सोमवारी तिला घरी सोडण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे.
रयत गल्ली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस कुत्र्यांकडून रात्रीच्या वेळेस गल्लीतील वाहनांच्या सीट, कार कव्हर, चप्पल तसेच वाळत घातलेले कपडे फाडले जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या घटनेनंतर गल्लीतील नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नागरिकांनी महापालिकेने तात्काळ दखल घेऊन बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
