बेळगाव – येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांना कामेरी येथील श्री शिवाजी वाचनालयाचा प्रतिष्ठित “जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार, दि. 18 जानेवारी रोजी ईश्वरपूर येथे होणाऱ्या चौथ्या मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलनाच्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. विनोद गायकवाड यांनी आपल्या दीर्घ आणि समर्पित साहित्यसेवेद्वारे मराठी साहित्याला दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल तसेच मराठी भाषेच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात येत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील असून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. गायकवाड यांना प्रदान केला जाणार आहे.
आजवर 59 कादंबऱ्यांचे लेखन करणाऱ्या डॉ. विनोद गायकवाड यांची साठावी कादंबरी ‘दैवजात दुःखे भरता’ ही रामायणावर आधारित असून नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत चार कथासंग्रह, दहा समीक्षा ग्रंथ आणि सहा नाटके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांच्या अनेक कादंबऱ्यांची कन्नड, इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती व कोकणी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.
या जीवनगौरव पुरस्काराच्या घोषणेमुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून डॉ. विनोद गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
