बेळगाव :
बेळगाव शहर महापालिकेच्या अखत्यारीतील दलित समाजासाठी राखीव असलेल्या अनुदानाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप कर्नाटक दलित संघर्ष समिती, बेळगाव यांनी केला आहे. तसेच किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्ध आणि के.एल.ई. चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांच्या स्थापनेस होत असलेल्या दीर्घ विलंबाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक 20 जून 2015 रोजी दोन्ही पुतळे उभारण्याचा ठराव एकमताने मंजूर होऊनही, आजतागायत ना कोनशिला स्थापना झाली, ना कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात वारंवार अधिवेशन काळात आंदोलने करूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक दलित संघर्ष समिती, बेळगाव यांच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी महापालिकेसमोर भव्य आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान महानगर पालिकेला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दलितांसाठीच्या निधीच्या वापराची चौकशी करावी तसेच पुतळा प्रतिष्ठापनेची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेस जिल्हा प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
