बेळगाव : जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या नूतन अध्यक्षांचा अधिकारग्रहण सोहळा तसेच नूतन कार्यकारिणीचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात अरुण काळे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर जॉईंट्स प्रार्थना, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मावळते अध्यक्ष यलाप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतात जॉईंट्सचे अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रवासामुळे त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला असून संघटनेमुळे अनेक चांगले मित्र लाभल्याचे त्यांनी सांगितले. मावळते सचिव मुकुंद महागावकर यांनी कार्यकाळात सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण दिलेल्या पदाला न्याय देऊ शकल्याचे नमूद केले. कार्यकाळात तब्बल ३२ प्रकल्प राबविल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
यानंतर नवीन सदस्यांचा शपथविधी पार पडला. त्याचबरोबर नूतन अध्यक्ष लक्ष्मण शिंदे आणि सचिव विश्वास पवार यांचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी दिनकर अमीन (सेंट्रल कमिटी मेंबर), पांडुरंग तळवेलकर (फेडरेशन ६ चे २६ वे अध्यक्ष) तसेच प्रमुख वक्त्या मृणालिनी पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

नूतन अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व माजी अध्यक्षांचे स्मरण केले. संघटनेत मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करून प्रभावी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. “जिथे गरज तिथे जॉईंट्स” या भावनेतून वर्षभर जास्तीत जास्त वेळ संघटनेच्या कार्यासाठी देणार असल्याचे सांगत त्यांनी सदस्य, कार्यकारिणी व आपल्या कुटुंबीयांचे आभार मानले.
यावेळी मावळते अध्यक्ष यालाप्पा पाटील व सचिव मुकुंद महागावकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच सुनील मुतकेकर यांना जॉईंट्स इंटरनॅशनलकडून मिळालेल्या असाधारण कर्तृत्व सन्मानाबद्दल दिनकर अमीन यांच्या हस्ते जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे गौरविण्यात आले.
फेडरेशन ६ चे माजी अध्यक्ष पांडुरंग तळवेलकर यांचा परिचय मधु बेळगावकर यांनी करून दिला. मनोगतात त्यांनी संघटनेचे संस्थापक नाना चुडासमा व शायना एन.सी. यांचा गौरव केला. नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करत प्रत्येक सदस्याने वर्षभरात किमान एक उपक्रम राबवावा, संघटना वाढवावी व एकत्रित कार्यातून जॉईंट्सचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
विश्वास पवार यांनी दिनकर अमीन यांचा परिचय करून दिला. अमीन यांनी जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या कार्याचे विशेष कौतुक करत जॉईंट्स भवनाच्या उभारणीचा उल्लेख केला. नूतन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे नाव अधिक नावलौकिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख वक्त्या मृणालिनी पाटील यांचा परिचय पुंडलिक पावशे यांनी करून दिला. मनोगतात त्यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी अनेक सदस्यांनी नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे बहुसंख्य सदस्य तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सदस्य तसेच हितचिंतक आणि मित्रमंडळींनी नूतन अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलीक पावशे यांनी केले तर वाय . एन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
