बेळगाव येथील भारताच्या पहिल्या एअरोस्पेस विशेष आर्थिक क्षेत्राला (Aerospace SEZ) माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान जागतिक पातळीवरील आघाडीच्या विमान कंपन्यांसाठी येथे उच्च-तंत्रज्ञान एअरोस्पेस घटकांची निर्मिती होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना सुरेश प्रभू यांनी २०१९ सालच्या आठवणींना उजाळा दिला. विमान वाहतूक मंत्री असताना भारतात विमाननिर्मितीची पायाभरणी घटक उत्पादनापासून करण्याचा रोडमॅप आपण तयार केला होता, असे त्यांनी सांगितले. ही संकल्पना मुंबई येथे मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘ग्लोबल एव्हिएशन समिट’मध्ये अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती.
आज त्या दूरदृष्टीपूर्ण आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना पाहणे अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. या एअरोस्पेस SEZ मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असून भारत जागतिक दर्जाची एअरोस्पेस व्हॅल्यू चेन उभारू शकतो, असा ठाम विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मेक इन इंडिया’ अभियानाला बळ देणाऱ्या या उपक्रमासाठी Aequs Limited चे त्यांनी अभिनंदन केले. भारतात मजबूत आणि शाश्वत एअरोस्पेस उत्पादन परिसंस्था उभारण्यात कंपनीने मोलाचे योगदान दिल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
