बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एका सराईत चोराला अटक करून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या दुचाकींची एकूण अंदाजे किंमत ₹४.९० लाख इतकी आहे.
मान्य पोलीस आयुक्त, बेळगाव शहर, तसेच कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे व वाहतूक विभागाचे मान्य पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच पी एस आय नागनगौड कट्टीमनीगौड यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी तक्रारदार तन्वीर अहमद फयाज मुजावर राहणार पिरनवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार तक्रारदाराची होंडा डिओ दुचाकी (हँडल लॉक लावलेली) बेळगाव–जांबोटी रोडवरील युवराज फोटो स्टुडिओसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी पोलिसांनी मल्लिकजान बाब्या फारुख बुडण्णवर (वय २०, रा. पिरनवाडी, सध्या कोतवाल गल्ली, बेळगाव ) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपीने सदर होंडा डिओसह एकूण सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये खानापूर रोड एपीएमसी व मरीहळ पोलीस ठाणे हद्दीत नोंद असलेल्या प्रत्येकी एका दुचाकी चोरी प्रकरणाचाही समावेश असल्याचे उघड झाले.
आरोपीकडून सर्व दुचाकी जप्त करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पथकाचे कौतुक करत प्रशंसा व्यक्त केली आहे.
