बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑनलाइन विवाह नोंदणी प्रणालीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सीमा इनामदार, राजू टक्केकर, मायकेल पिंटो व शशिकांत अंबेवाडिकर यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात ऑनलाइन विवाह नोंदणीमुळे गैरवापर होण्याची शक्यता असून पारदर्शकतेचा अभाव निर्माण होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली ऑनलाइन विवाह नोंदणी प्रक्रिया तात्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन विवाह नोंदणी पद्धत सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
पूर्वीच्या प्रक्रियेनुसार वधू-वर, त्यांचे पालक, साक्षीदार तसेच संबंधित नोंदणी अधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असावी. तसेच आधार कार्ड, वधू-वर तसेच पालक व साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या यांची प्रत्यक्ष कार्यालयात पडताळणी करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अशी ऑफलाइन पद्धत राबविल्यास विवाह नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राहील, फसवणूक व गैरप्रकारांना आळा बसेल आणि कुटुंब व समाजाच्या हिताचे संरक्षण होईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या गंभीर विषयाचा गांभीर्याने विचार करून जनहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
