बेळगाव : पाटील गल्ली, मंडोळी रोड, भवानी नगर येथील रहिवासी रोहन राजेश जाधव यांच्या घरी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय २४ डिसेंबर रोजी गोव्याला गेले होते. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी रोहन जाधव, त्यांचा भाऊ मनीष, मावशीचा मुलगा व गोव्यातील एक मित्र असे चौघे बेळगावला परतले होते. मात्र रोहन जाधव यांचे वडील राजेश जाधव व आई गोव्यातच थांबले होते. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी हे चौघे बेळगाव येथील हॉटेल रॉयल रिट्स येथे पार्टीसाठी गेले. रात्री उशीर न झाल्याने त्यांनी तेथेच रूम घेऊन मुक्काम केला.
१ जानेवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजता जाधव यांच्या घराशेजारील नागरिकांनी फोन करून घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ घरी धाव घेतली असता बेडरूमच्या खिडकीचे ग्रील कापलेले असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर हॉल तसेच देवघरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी पाहणी व तपास केला. तपासाअंती घरातून सुमारे पावणे तीन किलो चांदी (अंदाजे ३ लाख ६० हजार रुपये किमतीची) तसेच १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे.सोबतच घरातील काही महत्वाची कागदपत्रे देखील चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
या प्रकरणाची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रोहन जाधव यांचे वडील राजेश जाधव हे बेळगावमधील प्रसिद्ध व्यावसायिक असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
