बेळगाव : संगमेश्वरनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या सर्वे नंबर 42 बी मधील 14 गुंठे जागा बंजारा समाजासाठी मंजूर करण्यात यावी, अशी ठाम व कळकळीची मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत सुमारे 30 हजार लोकसंख्या असलेला बंजारा समाज अनेक वर्षांपासून वास्तव्यास असला तरी आजपर्यंत त्यांच्यासाठी स्वतंत्र समाजभवन उपलब्ध नाही.
यापूर्वी कर्नाटक राज्य तांडा विकास महामंडळाकडून 3 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून संगमेश्वरनगर येथे बंजारा समाजभवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या समाजभवनासाठी तत्कालीन आमदार व अध्यक्ष पी. राजू यांच्या हस्ते भूमिपूजन व शंकुस्थापना देखील पार पडली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे हे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही आणि मंजूर झालेले अनुदान पुन्हा शासनाकडे परत गेले.
या प्रकारामुळे बंजारा समाजावर अन्याय झाल्याची भावना समाजातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये वास्तव्यास असलेल्या बंजारा समाजातील अनेक कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे लोकवस्तीच्या मध्यभागी एक स्वतंत्र समाजभवन असणे अत्यंत गरजेचे असल्याचे समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने महापौर तसेच महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर शिवानंद चौहान, शरद पवार, प्रकाश राठोड, सुरेश लमाणी, लोकेश राठोड आणि अर्जुन राठोड यांच्या सह्या आहेत.
महापालिकेने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून बंजारा समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
