बेळगावातून भारताची लेझर शस्त्रक्रांती; स्टार वॉर्स’सारख्या तंत्रज्ञानात भारताची एन्ट्री, ‘H.A.R.A.’द्वारे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानात ऐतिहासिक पाऊल

बेळगावातून भारताची लेझर शस्त्रक्रांती; स्टार वॉर्स’सारख्या तंत्रज्ञानात भारताची एन्ट्री, ‘H.A.R.A.’द्वारे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानात ऐतिहासिक पाऊल

बेळगाव : भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय बेळगावमधून लिहिला जात आहे. एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील डीप-टेक स्टार्टअप Carbine Systems ने भारतातील पहिली खासगी स्तरावर विकसित केलेली लेझर-आधारित शस्त्र प्रणाली H.A.R.A. Mk-1 यशस्वीपणे चाचणीस उतरवली आहे. या घडामोडीमुळे बेळगाव हे देशाच्या अत्याधुनिक संरक्षण संशोधनाच्या नकाशावर ठळकपणे समोर आले आहे.

ही 10 किलोवॅट क्षमतेची Directed Energy Weapon (DEW) प्रणाली असून, ती 1 ते 2 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य निष्क्रिय करण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात येते. या प्रणालीची प्राथमिक चाचणी नियंत्रित इनडोअर वातावरणात घेण्यात आली. अत्यंत गोपनीयतेत पार पडलेल्या या चाचण्या ‘प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट’ म्हणून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Carbine Systems ही कंपनी गिरीश जोशी आणि केदार जोशी यांनी स्थापन केली असून, सुरुवातीला ती उच्च-ऊर्जा लेझर वापरून संरक्षण व एअरोस्पेस क्षेत्रासाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञान विकसित करत होती. धातू व कॉम्पोझिट घटकांची दोषमुक्त निर्मिती, उष्णता सहन करणारे मजबूत भाग आणि अचूक बीम-कंट्रोल यातील संशोधनातूनच पुढे H.A.R.A. या लेझर शस्त्र प्रणालीचा जन्म झाला.

विशेष म्हणजे, कंपनी आपले लेझर संशोधन व विकास केंद्र बेळगावमध्ये उभारत असून, कोणताही सरकारी किंवा खासगी निधी न घेता हा प्रकल्प पूर्णतः स्वतःच्या भांडवलावर विकसित करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी वापरला जात असताना, बेळगावातून उभे राहिलेले हे तंत्रज्ञान देशभरात लक्ष वेधून घेत आहे.

भविष्यात Carbine Systems कडून अधिक शक्तिशाली, मेगावॅट क्षमतेच्या लेझर प्रणाली, संरक्षणाबरोबरच अणुऊर्जा संशोधन आणि प्रगत उत्पादन क्षेत्रासाठी वापरता येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

बेळगावमधून विकसित झालेले H.A.R.A. Mk-1 हे केवळ एक शस्त्र नसून, भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी संरक्षण धोरणाला बळ देणारे एक ठोस पाऊल मानले जात आहे. देशाच्या संरक्षण नवोन्मेषात बेळगावचे नाव आता अभिमानाने घेतले जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 16 =

error: Content is protected !!