मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा; बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे वितरण
बेळगांव : सत्तेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जात असल्याने आज लोकशाहीला धोका निर्माण झाला असून, तिचे संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी पत्रकारांवर आहे, असे प्रतिपादन बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. मराठी पत्रकार संघातर्फे मंगळवारी (६ जानेवारी) पत्रकार दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पत्रकार दिनानिमित्त संघातर्फे दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार बालमुकुंद पत्की यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वास धुराजी यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. यानंतर संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे विश्वास धुराजी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच धुराजी यांच्या हस्ते बालमुकुंद पत्की यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे विश्वास धुराजी यांनी आपल्या भाषणात पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला. समाजात होणाऱ्या अन्यायाविरोधात पत्रकार आवाज उठवून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असतात. युद्धकाळातसुद्धा जीव धोक्यात घालून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचे कार्य पत्रकार करतात, असे ते म्हणाले.
पुरस्कार स्वीकारताना बालमुकुंद पत्की यांनी आपल्या मनोगतात पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आभार मानले, तर कार्यवाह महेश काशीद यांनी सूत्रसंचालन केले.
पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
