बेळगांव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मेक इन इंडिया व मेड इन इंडिया संकल्पनेचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील कणगला गावचा तरुण युवक मेघदूत बाळासाहेब गोंधळी याने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मेघदूत हा कणगला (बेळगांव) ते तिरुपती असा सुमारे दीर्घ पल्ल्याचा प्रवास सायकलवरून पूर्ण करणार असून, या प्रवासासाठी त्याला अंदाजे ९ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
या जनजागृती सायकल यात्रेअंतर्गत नुकतेच मेघदूतचे बेळगांव शहरात आगमन झाले. यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी मेघदूतचा हार, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रोहन कोकणे, समाजसेवक शिवशंकर मल्लूर, विश्वनाथ येळ्ळूरकर, अथर्व येळ्ळूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला पाठिंबा दिला.
मेक इन इंडिया व मेड इन इंडिया सारख्या राष्ट्रीय उपक्रमांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी एका तरुणाने सायकल प्रवासासारख्या कष्टदायक मार्गाची निवड केल्याबद्दल सर्व स्तरातून मेघदूत गोंधळी याचे कौतुक होत आहे.
