बेळगाव शहरात ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धातही सक्रिय व आनंदी राहण्यासाठी सर्वप्रथम शरीर स्वास्थ्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद पंडित यांनी दिला. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो येथील ज्येष्ठ नागरिक उद्यानात आयोजित स्नेहमेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी सुदृढ शरीर हे सशक्त मनाची पायाभरणी करते, असे सांगत नियमित व्यायाम, संतुलित आहार व योगाभ्यासाबाबत उपस्थितांना उपयुक्त मार्गदर्शन केले. ज्येष्ठांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास ते कुटुंबासाठी ओझे न ठरता प्रेरणास्थान बनू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रकाश कुडतरकर व विठ्ठल पोलो यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी तसेच क्वेस्ट टुर्सचे व्यवस्थापक प्रभाकर सुतार उपस्थित होते.
सभासदांसाठी आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन प्रसाद पंडित यांच्या हस्ते झाले. संगीत खुर्ची व रिंग थ्रो या स्पर्धांमध्ये अनंत सावंत, रविंद्रनाथ जुवळी, औदुंबर शेट्ये, सुधाकर राणे, ज्योती अगरवाल, अश्विनी पाटील, संगिता जोशी व मीना कुलकर्णी यांनी यश संपादन केले. विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ही बक्षिसे क्वेस्ट टुर्स यांच्या सौजन्याने देण्यात आली.
कार्यक्रमास महापौर मंगेश पवार यांनीही सदिच्छा भेट देत ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. बी. जी. शिंदे, जगमोहन अगरवाल, रविंद्रनाथ जुवळी, डॉ. श्रेयश चौगुले व औदुंबर शेट्ये यांनी विविध गीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमात निळकंठ गाडगीळ (सी.ए.), विजय पाटील (सी.ए.), विजय वाईगडे, वनिता जोशी व महेश सुतार यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक कार्यवाह सुरेन्द्र देसाई यांनी केले. पाहुण्यांची ओळख शिवराज पाटील यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन विजय वाईगडे यांनी केले.
