बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना, बेळगाव यांच्यातर्फे मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उद्या रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या प्रसंगी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी, समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, मराठा समाजाचे नेते किरण जाधव, भूषण काकतकर, डॉ. गणपत पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थान तालुका अध्यक्ष भरत पाटील, केंपन्नावर, हाणगोजी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
विजयी पैलवानांसाठी ‘बेळगाव केसरी वन’ हा मानाचा पुरस्कार ठेवण्यात आला असून, महिलांसाठीही स्वतंत्रपणे ‘महिला बेळगाव केसरी वन’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या स्पर्धेत पुरुषांसह महिला पैलवानांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या होणाऱ्या या मोफत निकाली कुस्त्यांसाठी आनंदवाडी कुस्ती आखाडा सज्ज झाला असून, बेळगाव व परिसरातील सर्व कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी केले आहे.
