बेळगाव :
१५ जानेवारी २०२६ पासून बेळगाव विमानतळावरील विविध प्रवासी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने संपूर्ण उत्तर-पश्चिम कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र व गोवा सीमाभागातील व्यापार, वाणिज्य, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव कापड व्यापारी संघटना (Belgaum Cloth Merchants Association – BCMA) व ट्रेडर्स फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे ठोस हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
आज संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत बेळगाव विमानतळाचे संचालक श्री. एस. त्यागराजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी १५ जानेवारीपासून विमानसेवा बंद झाल्यास व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील रुग्ण तसेच शासकीय अधिकारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. बेळगाव हा कर्नाटकाची दुसरी राजधानी असून येथे सुवर्ण विधानसौध, अनेक विभागीय कार्यालये, न्यायालये, शिक्षणसंस्था व संरक्षण आस्थापना असल्यामुळे सातत्यपूर्ण हवाई संपर्क अत्यावश्यक असल्याचे मत मांडण्यात आले.
संघटनांनी २०१९ मध्ये उडान योजनेअंतर्गत लागू असलेल्या १३ सेक्टर मॉडेलचा संदर्भ देत, त्या धर्तीवर मुंबई, पुणे, सुरत, नाशिक, अहमदाबाद, जयपूर, नागपूर, जोधपूर आदी महत्त्वाच्या शहरांशी थेट विमानसेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची ठाम मागणी केली. यामुळे व्यापार, उद्योग व पर्यटन क्षेत्राला पुन्हा चालना मिळेल, असेही सांगण्यात आले.
यावेळी वरिष्ठ तांत्रिक अधीक्षक श्री. सुभाष पाटील यांनी नव्या टर्मिनल इमारतीच्या कार्यपद्धती, क्षमता, सुरक्षा व्यवस्था व भविष्यातील विस्तार योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. नवीन टर्मिनलमुळे प्रवासी सुविधा अधिक सक्षम होणार असून, वाढीव हवाई वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळ संचालक श्री. एस. त्यागराजन यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत, बेळगाव विमानतळाची पूर्वीची वैभवशाली ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय, विमान कंपन्या व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. विमानसेवा पुनर्स्थापनेसाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस पुढील सदस्य उपस्थित होते सतीश तेंडुलकर (अध्यक्ष – बीसीएमए व ट्रेडर्स फोरम), मुकेश खोढा (सचिव – बीसीएमए), मुकेश संघवी, नितेश जैन, राजू पालीवाला, लालचंद छापरू, सुभाष पाटील (वरिष्ठ तांत्रिक अधीक्षक).
बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व युवकांच्या संधी वाढवण्यासाठी विमानसेवा अखंड सुरू राहणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यापारी संघटनांनी एकमुखाने व्यक्त केले.
