बेळगाव, ६ जुलै २०२५:
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मुरगुंडी परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसची जोरदार धडक कारला बसल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मृतांमध्ये गिरीश बल्लोरगी, राहुल, आणि संगू अमरगोंड या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्याचे रहिवासी होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राधिका या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हे सर्वजण कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना मुरगुंडीजवळ हा अपघात झाला. बस आणि कारमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या घटनेची नोंद अथणी पोलीस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास सुरु आहे.