महिला विद्यालय मंडळाच्या महिला विद्यालय हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. सचिन बिच्चू प्रमुख उपस्थित होते. प्रसिद्ध स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एन. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या शिस्तबद्ध पथसंचलनाने झाली. मुख्याध्यापक के. एन. पाटील यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व ध्वजारोहणानंतर क्रीडा शपथविधी पार पडला.
यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी लाठी-काठी, योगासने, कवायती, लेझिम, उत्कृष्ट बँडपथक तसेच भारतीय नृत्यांची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करत आपली कौशल्ये सादर केली. या सादरीकरणांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा स्पोर्ट्स जॅकेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे सूर्यकांत हिंडलगेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी नियमित मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या क्रीडा महोत्सवाला शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
