चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास त्या जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी डॉ. आंबेडकर जनजागृती सेवा संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले.
चिक्कोडीच्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाय ठेवलेला असून, त्यांच्या कार्याचा व विचारांचा या भागाशी ऐतिहासिक संबंध आहे. त्यामुळे चिक्कोडी जिल्ह्याला त्यांच्या नावाने नामकरण केल्यास काँग्रेस सरकारकडून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने सन्मान दिला जाईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
चिक्कोडी स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी दलितधार्जिण्या संघटना सातत्याने पाठिंबा देत असून, उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वीच डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या नावाने जिल्हा नामकरण करण्यात आले आहे. सरकारला बाबासाहेबांबद्दल खरेच आदरभाव असल्यास बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा व त्या जिल्ह्याला आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जर आंबेडकर यांचे नाव जिल्ह्याला देण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रावसाब फकिरें, कार्यदर्शी सुदर्शन तम्मण्णवर, खजिनदार महादेव मुन्नोळिकर यांच्यासह निरंजन कांबळे, नंदकुमार दरबारे, मारुती कांबळे, मनोहर बाळनायिक, सुरेश तळवार, माळगे आदी उपस्थित होते.
