बेळगाव :
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित मराठी विद्यानिकेतन, बेळगाव यांच्या वतीने ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या सहृदय सत्कार सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित ‘परिवर्तनाचा वाटसरू’ ही बाल एकांकिका सादर करण्यात येणार आहे.
डॉ. शिवाजीदादा कागणीकर हे बेळगाव परिसरातील सर्वोदयी गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ग्रामीण भागात पाणी अडवा–पाणी जिरवा, सेंद्रिय शेतीचा प्रसार, वृक्षारोपण, श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, रात्र शाळा, कलिका केंद्रे, जनजागरण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम, बायोगॅस प्रकल्प, दारूबंदी तसेच बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती असे अनेक पर्यावरणपूरक व समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवून अनेक गावांचा कायापालट घडवून आणला आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना कर्नाटक शासनाचा मानाचा देवराज अर्स पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच गदग व राणी चन्नम्मा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
मराठी विद्यानिकेतन शाळेशी डॉ. कागणीकर यांचा स्नेह अतिशय दृढ असून ते विद्यार्थ्यांसोबत विविध पर्यावरणपूरक उपक्रम व शिबिरांचे आयोजन सातत्याने करत असतात. नुकतीच त्यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून, त्यांच्या या दीर्घकालीन समाजकार्याच्या सन्मानार्थ मराठी विद्यानिकेतनतर्फे हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास बेळगाव परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तसेच पुरोगामी व कष्टकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.
