बेळगाव :
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आणि दिपू दास याला न्याय मिळावा, या मागणीसाठी हमारा देश संघटना – बेळगाव तर्फे सोमवारी टिळकवाडी येथील सोमवार पेठेतील मारुती मंदिर परिसरात शांततेत जनजागृती व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान भाविकांना माहितीपत्रके वाटप करण्यात आली. विविध फलकांच्या माध्यमातून विषयाची माहिती देण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित भाविकांना मोहिमेचा उद्देश समजावून सांगितला. यावेळी ३५० हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या व संपर्क तपशील असलेले निवेदन संकलित करण्यात आले असून, हे निवेदन योग्य मार्गाने माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला. अनेक भाविकांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील उपक्रमांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असून, संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला.
हमारा देश संघटनेने सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी असे उपक्रम पुढेही राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
