चलवेनहट्टी येथे प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण उत्सव उत्साहात साजरा

चलवेनहट्टी येथे प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण उत्सव उत्साहात साजरा

चलवेनहट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण उत्सव (कलिका हब्ब) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे होते. प्रमुख अतिथी म्हणून हंदिगनूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. एस. पाटील, हंदिगनूर केंद्र प्रमुख एन. बी. बाळीगट्टी तसेच न्यु इदलोंढ येथील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका शितल गोळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पेन देऊन करण्यात आले.

प्रास्ताविकात चलवेनहट्टी शाळेचे मुख्याध्यापक एम. सी. वार्णुळकर यांनी शिक्षण उत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. बौद्धिक क्षमतेने मागास असलेल्या विद्यार्थ्यांमधील कला-गुण ओळखणे व त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून शासनाच्या वतीने दरवर्षी विविध शाळांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.

एन. बी. बाळीगट्टी यांनी सरकारी शाळांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी जी. एस. पाटील यांनी पालकांनी आपल्या पाल्यांची इतर मुलांशी तुलना करून त्यांच्यावर दडपण आणू नये, संवाद साधावा व मुलांमध्ये कोणत्या कलेची आवड आहे हे ओळखून योग्य मार्गदर्शन करावे, असा सल्ला दिला.

शितल गोळे यांनी सध्याच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देत शिक्षक व पालकांनी समन्वय साधून विद्यार्थ्यांकडे लक्ष दिल्यास बौद्धिक क्षमतेने मागास असलेले विद्यार्थी मुख्य प्रवाहात येऊ शकतात, असे मत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर पालकांनी विशेष लक्ष दिल्यास मुले शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होतील, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात मनोहर हुंदरे यांनी शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा उल्लेख केला. शिक्षण उत्सवासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सुधारत असून मध्यान्ह आहार, पुस्तके, बूट आदी सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. काही पालक खोट्या प्रतिष्ठेपायी मातृभाषेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून इंग्रजी माध्यमाकडे वळत असल्याने मुलांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच नव्या मॅग्नेटिक योजनेच्या आडून सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद करून त्याविरोधात पालक व शिक्षकांनी एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी चलवेनहट्टी शाळेच्या शिक्षिका टी. जी. नगरकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच हंदिगनूर केंद्र प्रमुख बी. एन. बाळीगट्टी यांना मराठा महासंघाच्या वतीने उत्तम कार्यशील केंद्र प्रमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरूप फेटा, शाल व श्रीफळ असे होते. श्रीशैल कमत यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमास एन. डी. गुड्डसी, एम. जे. कांबळे, एम. जे. कुरिस, डी. एल. मल्हारी, उपाध्यक्ष नंदिनी कंलखाबकर यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण उत्सवाच्या निमित्ताने केंद्रातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक क्षमतेनुसार अंकगणित, लेखन, वाचन, चित्रकला तसेच आशा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + seventeen =

error: Content is protected !!