बेळगांव :
बेळगांव येथील मित्रा फौंडेशनच्या वतीने मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी ‘सशक्त वनिता’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सुरेखा लॉन, उद्यमबाग येथे आयोजित केला जाणार आहे.
या कार्यक्रमात मूळच्या बेळगांवच्या व सध्या बेंगळूर येथे कार्यरत असलेल्या ट्रिनिटी होमिओपॅथिक क्लिनिकच्या संस्थापिका डॉ. कविता सावंत या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महिलांना भेडसावणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या, त्यांची कारणे तसेच त्यावर होणारे उपाय याबाबत त्या सविस्तर माहिती देणार असून, प्रत्यक्ष मार्गदर्शन व समुपदेशनही करणार आहेत.
महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, वेळेवर उपचार घ्यावेत आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या उपयुक्त कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मित्रा फौंडेशनच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.
