कंग्राळी खुर्द :
येथील गावाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती लगतच्या उर्वरित गटार कामास अखेर प्रारंभ झाला आहे. यापूर्वी तीन विविध विकास योजनांतून मूर्ती सभोवतालची कामे पूर्ण झाल्याने परिसर सुशोभित झाला असून, आता उर्वरित गटार कामामुळे संपूर्ण परिसर चकाचक होत आहे. त्यामुळे शिवप्रेमींसह सर्व नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, गावाच्या प्रवेशद्वाराजवळील शिवमूर्ती परिसरात सुमारे २५ फूट व्यासाचा भाग अनेक वर्षांपासून खड्डेमय होता. या समस्येबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गेल्या तीन वर्षांत अनेक निवेदने देऊन आंदोलने केली होती. अखेर मंत्री श्री. हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षी या भागाचे काँक्रीटीकरण करण्यात आले.
मात्र, शिवमूर्ती परिसरात तीन बाजूंनी येणाऱ्या गटारींचे काम २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याने पावसाळ्यात गटारी तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी व कचरा मूर्तीसभोवती साचत होता. या समस्येवर उपाय म्हणून पाठीमागील गटार व नाल्यावरील काँक्रीटीकरणाचे काम १५व्या वित्त आयोगांतर्गत सुमारे १६ लाख रुपये खर्च करून आठ महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. तसेच मराठी शाळेच्या बाजूने येणाऱ्या गटारीचे कामही १५व्या वित्त आयोगातून सुमारे ८ लाख रुपये खर्च करून एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे.
आता उर्वरित गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गटारीचे काम इस्त्रो (ESROW) योजनेतून सुमारे ३ लाख रुपयांच्या अनुदानातून ६८ मीटर लांबीचे सुरू करण्यात आले आहे. या कामाचा ठेका ठेकेदार महेश पाटील यांच्याकडे असून, ग्रामपंचायत सदस्य यल्लापा पाटील, रमेश कांबळे, प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार व राकेश पाटील हे जातीने लक्ष घालून कामाची पाहणी करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा परिसर आता पूर्णतः स्वच्छ, सुशोभित व आकर्षक होत असल्याने शिवप्रेमींसह कंग्राळी खुर्दमधील सर्व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
