बेळगाव : शहरातील मिलेनियम गार्डनसमोर गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास असलेला एक अज्ञात वृद्ध सोमवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. संबंधित वृद्धाने मागील रात्रही त्याच ठिकाणी काढली होती. तीव्र थंडी व वृद्धापकाळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी पोलिसांना कळविले. तसेच माजी महापौर विजय मोरे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ शववाहिकेची व्यवस्था करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत मृतदेह सन्मानाने हलविण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
तिळकवाडी पोलीस ठाण्याचे सीपीआय पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन कक्षात हलविण्यात आला.
या वेळी माजी महापौर विजय मोरे, नगरसेवक नितीन जाधव, पद्मा प्रसाद हूळी, संतोष दरेकर, संजय प्रभू, सतीश कुगाजी, जयदीप जाधव, शशिकांत अंबेवडिकर, गौतम श्रॉफ, शववाहिका कर्मचारी निसार शमशेर व संजय कोलकर तसेच पोलीस कर्मचारी नवीन आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या तत्परतेमुळे अज्ञात मृत व्यक्तीवर सन्मानपूर्वक प्रक्रिया करण्यात येऊन सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या.
