बेळगाव, दि. २० डिसेंबर २०२५ — आज बेळगाव येथे विधान परिषद आमदार एम.जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. होदेगेरी येथील छत्रपती श्री शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर भव्य स्मारक उभारण्यासाठी मूळ संकल्पना व प्रस्ताव तयार करणारे आमदार एम.जी. मुळे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने शासनाकडे मागण्या सादर करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
या मागणीची दखल घेत बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच आमदार एम.जी. मुळे यांचे अभिनंदन करण्यात आले.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडूनही सकारात्मक पावले उचलण्यात आली असून या संकल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी प्राचार्य आनंद आपटेकर यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. आजच्या बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असता, जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
या प्रस्तावित बैठकीत छत्रपती श्री शहाजी महाराज समाधी स्थळाच्या विकासाबाबत ठोस व निर्णायक निर्णय घेतले जातील, अशी आशा उपस्थित व्यक्तींनी व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी आमदार एम.जी. मुळे यांच्यासोबत रुग्णसेवक प्राचार्य आनंद आपटेकर तसेच जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.
