बेळगाव (प्रतिनिधी) उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील इयत्ता दहावी सन १९८२ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, सत्कार समारंभ व व्याख्यान असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते व प्रवचनकार गणेश शिंदे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
“आनंद ही संकल्पना पैशाने विकत घेता येत नाही. शाळेतील दिवस हे मंतरलेले दिवस असतात. ते आयुष्यात पुन्हा येत नाहीत. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक क्षणाचा आनंद वेचत व टिपत चला. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदमय करा,” असे सुंदर विचार गणेश शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक पि.के तरळे होते. व्यासपीठावर डॉक्टर शिवाजीराव कागणीकर, माजी महापौर विजय मोरे, ऑनररी लेफ्ट. नारायण देसाई, आर. आय. कोकितकर, पी.एम टपालवाले, के. बी. सांबरेकर, वाय. बी. चौगुले, एल. बी. आनंदाचे लक्ष्मणराव होनगेकर, पी. एल. सोमनाथ, एन. ओ. चौगुले, गणपतराव देसाई, एल. डी. चौगुले, उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे, एल. एन. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर उत्तम तळे यांनी प्रास्ताविकात बोलताना, “आपण तिसऱ्यांदा स्नेहमेळावा आयोजित करत असून, उचगाव पंचक्रोशीतील नागरिकांना गणेश शिंदे यांच्यासारख्या प्रभावी व्याख्यात्याचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे,” असे सांगितले.
यावेळी संरक्षण दल, पोलीस दल, महसूल विभाग, औद्योगिक आस्थापना, शिक्षण क्षेत्र तसेच विविध शासकीय सेवांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रामा लाळगे, विठ्ठल मेणसे, एम. वाय. कोरडे, देवाप्पा मेणसे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. गौसेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय देसाई यांनी मानले. स्नेह, आठवणी आणि प्रेरणादायी विचारांनी भरलेला हा मेळावा उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.
