१४ व्या कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धेला आजपासून सुरुवात नाट्यरसिकांसाठी दोन दिवसांची नाट्यपर्वणी

१४ व्या कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धेला आजपासून सुरुवात नाट्यरसिकांसाठी दोन दिवसांची नाट्यपर्वणी

बेळगाव (प्रतिनिधी) सलग १४ व्या वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी एकांकिका स्पर्धा आजपासून सुरू होत असून, ही स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. येथील कॅपिटल वन मल्टिपर्पज सोसायटी ही संस्था सातत्याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करीत असून, रंगभूमीला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुभवी व मातब्बर परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून,
प्रमोद काळे (पुणे), सुनील खानोलकर (मुंबई) आणि वामन पंडित (सिंधुदुर्ग) यांना परीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.


प्रमोद काळे (पुणे) हे गेली ४५ वर्षे नाट्यलेखन, दिग्दर्शन व प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २५ एकांकिका व ७ नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले असून, महाराष्ट्रीय कलोपासक, जागर संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी दीर्घकाळ संबंधित आहेत. ‘अपूर्णात अपूर्णम’ या नाटकाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा लेखन पुरस्कार तसेच प्रायोगिक नाटकासाठी म.टा. पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सुमित्रा भावे, सई परांजपे यांच्यासमवेत चित्रपट क्षेत्रातही कार्य केले आहे.


वामन मधुसूदन पंडित (सिंधुदुर्ग) हे रंगभूमीविषयक अनेक पुस्तकांचे लेखक असून, ‘रंगवाचा’ हे नाट्यविषयक त्रैमासिक ते चालवतात. या नियतकालिकाला उत्कृष्ट अंकाचे पुरस्कार लाभले आहेत. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवलीचे ते सध्या अध्यक्ष असून, एकांकिका स्पर्धा, नाट्यमहोत्सव, संगीत त्रिसूत्री, अभिवाचन व नाटकघर योजना असे विविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत.


सुनील मोहन खानोलकर (मुंबई) यांनी ‘खोटं खोटं’, ‘अडथळा’, ‘हॅपी बर्थडे’, ‘सख्या धावाधाव’, ‘आता माघार नाही’, ‘वारसदार’ आदी नाटकांचे लेखन केले आहे. त्यांनी अनेक हिंदी मालिकांसाठी संवाद व पटकथा लेखन केले असून, ‘डायल 100’, ‘पंचनामा’, ‘क्राईम डायरी’ या मराठी मालिकांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ‘हॅपी बर्थडे’ या नाटकाला नाट्यगौरव पुरस्कार, तर ‘क्राईम डायरी’ मालिकेला उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. ते गेली २५ वर्षे एकांकिका व नाटकांचे परीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमुळे स्थानिक व बाहेरील कलाकारांना व्यासपीठ मिळत असून, नाट्यरसिकांसाठी ही स्पर्धा एक खरी नाट्यपर्वणी ठरणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 3 =

error: Content is protected !!