बेळगाव:
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची सविस्तर बैठक आज मराठा मंदिर येथे संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करत सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न, सध्याची परिस्थिती आणि युवकांची भूमिका यावर सविस्तर मांडणी केली.
यानंतर झालेल्या चर्चेत अध्यक्ष शुभम शेळके यांनी संपूर्ण सीमाभागात मराठी सन्मान यात्रा काढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत लढ्याच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले युवक आणि मराठी भाषिक पुन्हा एकत्र आणण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले. “लढा केला नाही तर गुलामीची सवय लागते. त्यामुळे ही केवळ यात्रा न राहता लोकचळवळ व्हावी,” असे मत व्यक्त करत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

बैठकीत गजानन शहापूरकर यांनी मराठी भाषेच्या वापराबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका केली. राष्ट्रीय पक्षांचे लोकप्रतिनिधी मतदारांकडे मराठीत अर्ज देऊन सेवा देतात; मात्र प्रशासकीय पातळीवर मराठीसाठी आग्रह धरताना दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठी नगरसेवकांनी मराठी भाषेच्या वापरासाठी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा त्यांना जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजू पाटील यांनी मराठी सन्मान यात्रेला अनुमोदन देत, संघटितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही यात्रा यशस्वी करूया, असे मत मांडले. रमेश माळवी यांनीही यात्रेस पाठिंबा दर्शविला.
मोतेस बारदेसकर यांनी निवडणुकांपुरता मराठी भाषेचा वापर न करता, दैनंदिन व शासकीय व्यवहारात कायमस्वरूपी मराठीचा वापर व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीत महत्त्वाची भूमिका मांडताना सांगितले की, २१ जानेवारी रोजी असलेल्या न्यायालयीन सुनावणीला कोणतीही बाधा निर्माण होऊ नये किंवा त्याचा विपरीत संदेश जाऊ नये, यासाठी मराठी सन्मान यात्रा २१ जानेवारीनंतरच आयोजित करण्यात यावी. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, विविध घटक समित्या तसेच समितीचे नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून यात्रेची अंतिम तारीख निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आणखी एक महत्त्वाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगावात आयोजित व्हावे, यासाठी अधिकृत मागणी करण्यात यावी, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक अस्मितेला बळ मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस अशोक घगवे, शिवाजी हावळानाचे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सचिन दळवी, सागर कणबरकर, इंद्रजित धामाणेकर, रणजित हावळानाचे, निलेश काकतकर, सुरज जाधव, साहिल तिनेकर, राहुल बेनाळकर, श्री जाधव, कुणाल जाधव, रोहित जाधव, ओंकार जाधव, निरंजन जाधव, गणेश मोहिते, श्रीकांत नांदूरकर, विनायक मजुकर, राजू पावले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप सरचिटणीस मनोहर हुंदरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
