सिंधुदुर्ग जलतरण संघटनेच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग येथील चिवला बीचवर भव्य सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगाव येथील गोवावेस व अशोकनगर भागातील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा स्पोर्ट्स क्लबच्या सानिध्यात सराव करणाऱ्या डॉल्फिन ग्रुपच्या मास्टर्स जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेत भरत पाटील यांनी उत्कृष्ट पोहण्याचे कौशल्य दाखवत तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. त्याचप्रमाणे कल्लाप्पा पाटील यांनी टॉप टेनमध्ये स्थान मिळवत दहावा क्रमांक मिळवला. इतर सहभागी जलतरणपटूंनीही तीन किलोमीटर व दोन किलोमीटर अंतराच्या सागरी जलतरण स्पर्धा मोठ्या चिकाटीने व आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
या स्पर्धेत सहभाग नोंदवून यश मिळवणाऱ्या जलतरणपटूंमध्ये अरुण जाधव, राजू पाटील, मुकेश शिंदे, गजानन शिंदे, महांतेश नवलगुंद, राजू पुजारी, प्रदीप पाटणकर, प्रशांत कांबळे, राजू जांगळे व महादेव केसरकर यांचा समावेश होता. सर्व यशस्वी जलतरणपटूंना रोख रक्कम, पदके व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या सर्व जलतरणपटूंना एन.आय.एस. जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार तसेच कल्लाप्पा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभत असून, त्याच्याच बळावर त्यांनी सागरी जलतरण स्पर्धेत हे यश संपादन केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
