बेळगाव तालुक्यातील किणये गावचे सुपुत्र आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मल्लांनी अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत दळवी यांच्या प्रशिक्षणाखालील खेळाडूंनी एकूण १८ पदकांची कमाई करत संघाचे नाव उज्ज्वल केले. यात ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. या दमदार कामगिरीमुळे ‘सर्व्हिसेस’ संघाने एकूण गुणांच्या आधारे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये ६७ किलो वजनी गटात सचिन, ७४ किलोमध्ये चंद्रमोहन, ७९ किलोमध्ये अमित, ८६ किलोमध्ये मुकुल, १२५ किलोमध्ये दिनेश तर ७२ किलो महिला गटात दीक्षा यांनी सुवर्णपदक मिळवले.
स्पर्धेत रेल्वे आणि सैन्यदल या दोन्ही संघांचे प्रत्येकी १९० गुण समान होते. मात्र आयोजकांनी नियमांनुसार रेल्वे संघाला जेतेपद घोषित केले, तर सैन्यदलाच्या संघाला दुसऱ्या क्रमांकाचे जेतेपद मिळाले.
विनायक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेली ही कामगिरी बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानास्पद ठरत असून, त्यांच्या प्रशिक्षणपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
