बेळगांव:
कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग १४ व्या वर्षी भव्य आंतरराज्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन २० व २१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांतील नामांकित संघांची आभासी पद्धतीने निवड करून या स्पर्धेत सहभाग निश्चित करण्यात येणार आहे.
स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटातील एकांकिका स्पर्धाही स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहेत. दर्जेदार एकांकिकांची मालिका नाट्यरसिकांना पाहता यावी यासाठी गेल्या वर्षापासून आभासी पद्धतीने निवड प्रक्रिया राबवून संघांना प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नीटनेटकेपणा, काटेकोर वेळेचे नियोजन, अनुभवी परीक्षकांची निवड व पारदर्शकता या वैशिष्ट्यांमुळे या स्पर्धेने नाट्य क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले असून देशातील नामांकित एकांकिका स्पर्धांमध्ये कॅपिटल वन स्पर्धेचा उल्लेख केला जात आहे.
वैभवशाली नाट्य परंपरा लाभलेल्या बेळगांव परिसरात किमान १५ ते २० वर्षे खंड पडलेल्या एकांकिका चळवळीला पुन्हा उर्जितावस्था देण्यासाठी गेल्या १३ वर्षांपासून संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. या दीर्घकालीन नाट्य चळवळीमुळे नाट्यरसिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विविध राज्यांतील कलाकारांच्या सहभागामुळे आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळत आहे. याच माध्यमातून नवे कलाकार, लेखक व दिग्दर्शक घडविण्याचा संस्थेचा उद्देश सफल होताना दिसत आहे.
बेळगांव परिसरातील नाट्यविश्वाला पुन्हा उभारी देणारी शालेय गटातील स्पर्धाही अत्यंत लाभदायक ठरत असून, जिल्हा मर्यादित असलेल्या या स्पर्धेत अनेक स्थानिक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
संस्थेने आपल्या अर्थकारणावर मजबूत पकड ठेवत बेळगांव शहर व परिसरातील नाट्यप्रेमी रसिकांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य चळवळ जपण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगांवकर जनता व नाट्यरसिकांकडून या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.
प्रवेश विनामूल्य खुला
ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुली ठेवण्यात आली आहे. मात्र शिस्तबद्ध आसन व्यवस्थेसाठी एकांकिका सुरू असताना नाट्यगृहात प्रवेश करू नये, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. संध्या देशपांडे, प्रा. अरुणा नाईक, सुभाष सुंठणकर, निळूभाऊ नार्वेकर यांच्यासह सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभत असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.
